Ad will apear here
Next
गावातील दिवाळी!


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक दिवाळीबद्दल लिहिले आहे कणकवलीतील तुषार हजारे यांनी...
.....
काळ बदलला, जगण्याची शैली बदलली, आनंदाच्या कल्पना बदलल्या, ताण बदलले, या बदलत्या जगात जगताना ग्रामीण भागात पूर्वापार पद्धतीने चालत आलेली दिवाळी साजरी करण्याची परंपरा अद्यापही जपली जात असून, या परंपरेनुसार हा सण साजरा केला जात आहे.

अश्विन महिन्याची सुरुवात झाली की शारदीय नवरात्रोत्सव येतो. या सणात नऊ दिवस आदिशक्तीचा जागर केला जातो. १०व्या दिवशी दसरा साजरा केला जातो. मग दिवाळीची चाहूल लागते. या सणाच्या तयारीची लगबग घरोघरी सुरू होते. घराची साफसफाई करणे, रंगरगोटी करणे, घरात फराळांचे पदार्थ तयार करणे अशा कामांची लगबग सुरू होते. फराळ तयार करण्यात महिलांमध्ये अधिक रुची असते, तर बांबूपासून पारंपरिक आकाशकंदील बनविण्यात पुरुषांना रस असतो, असे चित्र दिवाळीचा सण अवघ्या सात-आठ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना ग्रामीण भागातील घरांमध्ये दिसून येते. 
खरीप हंगामातील पिके तयार झालेली असतात. या उत्पादनांची विक्री झाल्याने प्रत्येकाच्या हातात पैसा खेळत असतो. त्यामुळे प्रत्येक जण दिवाळी साजरा करताना हात आखडता घेत नाही. धनत्रयोदशीपासून खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात होते. या दिवशी सोनेखरेदीची परंपरा आहे. या परंपरेनुसार प्रत्येक जण आपल्या परीने कमी-जास्त प्रमाणात सोने खरेदी करतो. तसेच प्रत्येकाच्या घरासमोर आकाशकंदील लावले जातात आणि अंगणात रात्री पणत्या किंवा मेणबत्त्या लावल्या जातात. पणत्यांच्या प्रकाशाने घर उजळून निघते. हे दृश्य पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. 

प्रत्येकाच्या घरासमोरील अंगणात महिलांचे रांगोळीचे कलाविष्कार नजरेस पडतात. नरक चतुर्दशीदिवशीच्या आदल्या दिवशी रानात जाऊन कारेटी (काकडीवर्गीय छोटे कडू फळ) घरी आणली जातात. रात्री आबालवृद्ध नरकासुराची प्रतिमा तयार करतात. ही प्रतिमा तयार करताना भाताचे गवत, बांबू, गोणपाटे, कागद या वस्तूंचा वापर केला जाते. त्या प्रतिमेमध्ये फटाके भरले जातात. मग त्याची रात्री धिंड काढली जाते आणि पहाटे नरकासुराचे दहन केले जाते. नरकासुर दहनापूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या खड्याने रस्त्यावर शुभ दीपावली, हॅपी दिवाळी असे शुभेच्छा संदेश लिहिले जातात. त्यानंतर घरी येऊन अभ्यंगस्नान केले जाते. 

अभ्यंगस्नानासाठी लागणारे पाणी मोठ्या माठात किंवा हंड्यामध्ये तापवले जाते. हा माठ किंवा हंडा नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी स्वच्छ धुतला जातो. त्यानंतर त्यावर कारेटी किंवा फुलांची माळ घातली जाते. त्यानंतर त्यामध्ये पाणी तापवले जाते. हे स्नान करताना सुगंधी उटणे आणि विशेष साबण लावला जातो. त्यानंतर घरासमोरील तुळशीवृंदावनासमोर कारेटी फोडून ‘गोविंदा रे गोपाळा’ असे म्हटले जाते आणि फोडलेल्या कारेट्याची बी खाल्ली जाते. त्यानंतर भातापासून बनविलेले पोहे हाताने पाठीमागे उडवून त्यानंतर ते प्रसाद म्हणून खाल्ले जातात. बच्चे कंपनी फटाके फोडण्याचा मनमुराद आनंद लुटते. फुलबाज्यांच्या तारा उलट्या करून त्या झाडांवर फेकल्या जातात. हे दृश्य आकाशातील ताऱ्यांप्रमाणे दिसते. प्रत्येक जण गावातील मंदिरांमध्ये जाऊन देवाचे दर्शन घेतो. त्यानंतर दिवाळीसाठी तयार केलेल्या फराळाचा नैवैद्य घरच्या देवाला दाखविल्यानंतर तो गायीला खायला दिला जातो.

सकाळी ११ पर्यंतच्या वेळेत प्रत्येक जण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात आणि फराळाचा आस्वाद घेतात. फराळामध्ये करंजी, चकल्या, लाडू, शंकरपाळी, कांदा पोहे, गोड पोहे (गुळापासून तयार कोलेले) असे पदार्थ असतात. शेजाऱ्या-पाजाऱ्यांना फराळाच्या पुड्या दिल्या जातात. काही काळापूर्वी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ग्रीटिंगकार्ड देण्याची पद्धत होती; पण ही पद्धत आता कालबाह्य झाली आहे. ही ग्रीटिंगकार्ड घरी बनविली जायची. 

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी घरोघरी लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. त्याचप्रमाणे व्यापारी वर्ग आपल्या दुकानात लक्ष्मी देवीचे पूजन विधिवत करतो. प्रत्येक जण एकमेकांच्या घरी व दुकानांमध्ये जाऊन लक्ष्मी देवीचे दर्शन घेतो. तिसरा दिवस म्हणजे पाडवा आणि चौथा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला मायेची भेटवस्तू देतो. 

दिवाळीच्या दिवसांमध्ये घरोघरी लावलेले पारंपरिक आकाशकंदील आणि पणत्या व मेणबत्त्यांचा प्रकाश घराला तेजोमय करून टाकत असतो आणि घरामध्ये आल्हाददायक वातावरण तयार होते. कारण घरात आणि रस्त्यावर मन उजळलेल्या माणसांचा राबता असतो. दिवाळीच्या दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आमाप उत्साह असतो आणि पाहुणे, नातेवाईकांचे येणे जाणे असते. त्याचप्रमाणे प्रत्येक जण फराळाचा आस्वाद आणि संवादाचा आनंद लुटतो. वाचनासाठी दिवाळी अंक असतात. 

कार्तिकी एकादशी झाल्यानंतर तुळशीविवाहाचा सोहळा घरोघरी रंगतो. या सोहळ्याच्या दिवशी घरासमोरील तुळशीवृंदावनाची रंगरंगोटी करून आकर्षक सजावट केली जाते. रात्री नातेवाईक व शेजारीपाजारी एकत्र येऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन मंगलाष्टका म्हणून तुळशीविवाह सोहळा पार पडला जातो. हा सोहळा पार पाडल्यानंतर चुरमुरे म्हणून प्रसाद दिला जातो. या काळात आवळा आणि चिंच तयार होते. ते खाण्याचा आनंद वेगळा असतो. त्रिपुरारी पौर्णिमा झाल्यानंतर दिवाळीची सांगता होत असली, तरी ग्रामीण भागात दिवाळीनंतर येणारी अमावास्या ही देवदेवाळी साजरी करून दिवाळीची सांगता होते. 

गावातील दिवाळी सण प्रत्येकासाठी माणसांचा, नात्यांचा, पिढ्यांचा दुवा प्रकाशाने जोडणारा सण असतो. म्हणून प्रत्येक जण मन उजळण्यासाठी आणि सकारात्मकतेची ज्योत पेटविण्यासाठी, या आदित्यहृदयी सणाचा आनंद लुटण्यासाठी दर वर्षी आतुरलेला असतो.

- तुषार हजारे, कणकवली

(आठवणीतली दिवाळी या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZSECF
Similar Posts
आकाशकंदील उडविण्याची परंपरा असलेली दिवाळी कलमठ (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील कोष्टी समाजबांधवांनी आकाशकंदील उडविण्याची वर्षानुवर्षांची परंपरा आजही जपली आहे. या आगळ्यावेगळ्या दिवाळीबद्दल लिहीत आहेत तुषार हजारे...
गरिबीच्या काळातली समृद्ध दिवाळी! १९७०च्या दशकात बेळगावमध्ये गेलेल्या लहानपणात अनुभवलेल्या दिवाळीच्या आठवणी लिहिल्या आहेत विजयालक्ष्मी देवगोजी यांनी...
दिवाळीच्या आठवणी जागवणारी चित्रपटगीते ‘सुनहरे गीत’ या सदरात दर वेळी आपण एखाद्या कलावंताबद्दलची माहिती घेऊन त्याच्या एखाद्या गीताचा आस्वाद घेतो. आजचा लेख मात्र वेगळा आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सदरलेखक पद्माकर पाठकजी यांनी स्मरणरंजनपर लेख लिहिला आहे. त्यांच्या लहानपणी किंवा तरुणपणात दिवाळीच्या काळात रेडिओवर ऐकल्या जाणाऱ्या ‘सुनहऱ्या’ चित्रपटगीतांच्या
आठवण पावसाळी दिवाळीची! यंदा राज्यात अनेक ठिकाणी दिवाळीच्या पहिल्या दोन दिवसांत प्रचंड पाऊस पडला. आता पाऊस ओसरला असला, तरी वातावरण पावसाळीच आहे. अशाच एका दिवाळीत अवचित आलेल्या पावसामुळे मुंबईतील चाळीत काय दाणादाण उडाली होती, याच्या आठवणी लिहिल्या आहेत अभय वैद्य यांनी..

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language